पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण’च्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होणार आहे. यासंदर्भात ‘इंडिया दर्पण’मध्ये दीड महिन्यांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर नगरीत यंदा साहित्यकुंभ भरणार आहे.
वर्धा येथे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले. आता पुढील साहित्य संमेलन ९७वे आहे. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) तर खानदेशातील जळगाव जिल्ह्याधील अमळनेर तालुक्यातून एक प्रस्ताव आला होता. तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव संमेलनस्थळाच्या यजमानपदासाठी आला होता.
या सर्व स्थळांची पाहणी केल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज पुण्यात बैठक झाली. यावेळी सर्व पाहणी अहवालांवर चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समितीने बैठकीपूर्वी सर्व चारही स्थळांना भेटी दिल्या. सर्व सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमळनेरच्या स्थळावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अमऱलनेरच्या मराठी वाडमय मंडळाने संमेलनासाठी प्रस्ताव दिला होता. तो स्वीकारण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर मराठवाड्यातील उदगीर तालुक्यात गेल्यावर्षी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे लगेच दोन वर्षांत मराठवाड्याला यजमानपद मिळण्याची शक्यता कमीच होती. अशात महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखा (सातारा), औदुंबर साहित्य मंडळ (सांगली) आणि मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर (जळगाव) ही तीन स्थळे स्पर्धेत होती. त्यात अमळनेरला प्राधान्य देण्यात आले.
अध्यक्षपदाची चर्चाही सुरू
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाल्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या दावेदाराची चर्चा सुरू झाली आहे. कारण संमेलनस्थळ निश्चित झाल्याने अध्यक्षपदासाठी नावांचे प्रस्ताव मागविले जाणार आहे. आता काही महिन्यांनी अध्यक्षाचे नाव घोषित होणार आहे.
Marathi Sahitya Sammelan Amalner Declared