इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हटलं की तशी तर अनेक नावं समोर येतात. अश्विनी भावे, किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर अशी भली मोठी यादीच समोर येते. सध्या या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर नाव आहे ते अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं. या वयातही अत्यंत फिट असलेल्या ऐश्वर्या नारकर या देखण्या तर आहेतच पण अभिनयसंपन्न देखील आहेत. नुकत्याच त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. त्यावर त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. नेहमी सोज्ज्वळ, सोशिक अशा भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी नकारात्मक भूमिका साकारण्याची ही बहुधा दुसरी वेळ. याआधी ‘कलर्स मराठी’वरील ‘स्वामिनी’ या मालिकेत त्यांनी गोपिकाबाई यांची नकारात्मक भूमिका साकारली होती.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी शॉर्ट्स घातलेला एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. तुम्ही असे छोटे कपडे कसे घालता? या उतारवयात हे धंदे कसे सुचतात? अशा अनेक कमेंट काहींनी केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांना याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.
“मी आतापर्यंत कधीही शॉर्ट्स घातली नव्हती. कॉलेजमध्ये असताना मी कधी साधी जीन्स देखील घातली नाही. मुळात मला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ते कपडे मी घालते. स्लिव्हलेस ब्लाऊज देखील मी आता घालायला लागले. मला ज्या कपड्यात योग्य वाटतं, ते कपडे मी घालते. मी शॉर्ट्स घातली, तेव्हा मला फार कम्फर्टेबल वाटत होतं. फिजिकली मी एकदम फिट आहे. गेल्या १८ ते २० वर्षांपासून मी योगा करते आहे.
मला असं वाटतं की ज्याला ज्या कपड्यांमध्ये छान वाटतं, त्याने ते कपडे घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे अशा कमेंट्स करुन उगाचच आपली शक्ती वाया घालवू नका. जर तुम्हाला आवडत नसेल तर मला अनफॉलो करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहेच. आम्हाला हे आवडलं नाही, असं तुम्ही चांगल्या भाषेत सांगू शकता. उगाचच दुसऱ्याला ट्रोल करण्यात वेळ वाया घालवू नका.
कोणत्याही गोष्टीत काय चांगलं घेता येईल ते पाहावं. ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली चार बोटं आपल्याकडे असतात. आपण किती फिट आहोत हे बघणं महत्वाचं आहे. हे करण्यात मला अत्यंत आनंद मिळतो. त्यामुळे मी काही वेगळं करतेय असं मला वाटत नाही. ही शॉर्टस वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मिळाले होते. मी ते फोटो पोस्ट करणारही नव्हते, पण मला ते चांगले वाटले, म्हणून मी ते पोस्ट केले होते. आता आयुष्यातली ५० वर्षे गेली, उरलेली किती हातात आहेत ते माहीत नाही. पण जे आहे त्यात आनंदी राहावं अशी माझी इच्छा आहे”, असेही ऐश्वर्या नारकर यांनी यावेळी म्हटले.
ऐश्वर्या नारकर यांना मराठी सिनेसृष्टीतील अतिशय साध्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्या अनेकदा साडी, चुडीदार ड्रेस, केसांची लांब वेणी याच लूकमध्ये फोटोशूट करत असतात. सोशल मीडियावर त्या त्यांच्या फिटनेसचे व्हिडीओही शेअर करताना दिसतात. सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहेत.
Marathi Actress Aishwarya Narkar Troll Shorts