विशेष प्रतिनिधी, नाशिक
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या बैठकीत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मागण्यांसाठी सरकारने २१ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मूक आंदोलन आम्ही १ महिने पुढे ढकलत आहोत. सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अतिशय उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आंदोलक समन्वय समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचे राजेंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत काय निर्णय झाले, मराठा आरक्षणाबाबत प्रशासकीय पातळीवर काय कार्यवाही केली जात आहे. यासह विविध प्रकारची विस्तृत माहिती राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर प्रलंबित मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी मूक मोर्चा आंदोलन आज नाशिक येथे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानावर झाले. या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरु झाले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह खासदार, आमदार यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.
सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलनासाठी काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करुन आंदोलक सामील झाले. तर काही जण काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले. मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा नाशिकला ठरवू असे संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यामुळे नाशिकच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबरोबरच नाशिकमध्ये राज्यभरातील समन्वयकांची बैठकही होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आज सुरु असलेल्या मूक मोर्चात उपस्थितीत मान्यवर आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या आंदोलनाला पाठींबा देत आपली भूमिका मांडली.
खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पत्रकार परिषद बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2011511075656647&id=103446941470343