नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या काही घटना देशात घडल्या. पण विद्यार्थ्यांची संख्या एक किंवा दोन होती. चंदीगडमध्ये मात्र तब्बल ३६ विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पीएमओ (PMO) ने यात दखल घेऊन प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चंदिगड येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च) अख्त्यारित कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ नर्सिंग एज्युकेशन (नाईन) येथील ३६ विद्यार्थिनींवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरून पीजीआयएमईआरच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाला चांगलेच धारेवर घेतले आहे. संबंधित विद्यार्थिनींना ‘मन की बात’ ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत पूर्वसूचना दिली होती.
व्याख्यान, चर्चासत्र यासारख्या नियमित शैक्षणिक उपक्रमांचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. हा मूल्य शिक्षणाचा एक भाग आहे. खरे तर ‘मन की बात’च्या आधीच्या भागात अवयवदान केलेल्या एका कुटुंबाशी पंतप्रधानांनी संवाद साधला होता. अवदानाचे हे प्रकरण ‘पीजीआयएमईआर’मधील होते. हे आमचे नैतिक बळ वाढवणारे आहे. पण या विद्यार्थिनी कोणतेही कारण न देता कार्यक्रमास गैरहजर राहिल्या, असे पीजीआयएमईआरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
हे तर अतीच झाले
या प्रकाराबाबत कोणताही वेगळा अर्थ काढू नये. तसेच जनहिताच्या दृष्टीने हा मुद्दा अधिक चिघळू नये याची काळजी घ्यावी, असे नम्र आवाहान करतानाच कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी ‘मन की बात’ न ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणे हे अतीच झाले, असेही पीजीआयएमईआरने कबुल केले आहे.
Mann ki Baat Girl Students Action Chandigarh