नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव १०८ फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव येत्या ३० जून पर्यंत चालणार आहे. या महोत्सवासाठी जैन बांधव देशाच्या विविध भागातून येणार आहेत.
आज सकाळच्या सुमारास विविध मान्यवरांच्या हस्ते भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कलषाभिषेक करण्यात आला. या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील शहरांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. यासाठी महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरूस्ती करणे व आवश्यक ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक त्वरीत लावण्यात आले आहेत.
महोत्सव काळात डोंगरावर मूर्तीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी लिफ्ट सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या भाविकांसाठी पथदीपांची सुविधा करण्यात आली आहे. महोत्सव काळात डोंगरावरील मूर्तीच्या ठिकाणी हरणबारी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनची सुविधा करण्यात आली आहे.
यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. यात्रेच्या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात रूग्णवाहिका, डॉक्टर्स, परिचारीका, औषधे यांची सुसज्ज व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या दृष्टीने जंतुनाशक औषधे फवारणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात येत आहे.