अजय सोनवणे, मालेगाव
मालेगाव – लग्न सोहळ्यात अनेक गोष्टी मॅच केल्या जातात. पण, उंची कमी असली की जोडीदार शोधणे अवघड होते. पण, मालेगावमध्ये चार फूट सहा इंच उंची असलेल्या नवरदेवाला त्यांच्या उंचीला साजीशी ४ फुटीची नवरी मिळाली. त्यानंतर कुटुंबियांनी हा लग्न सोहळा धुमधडाक्यात साजरा केला. आता या लग्नाचीच चर्चा सध्या मालेगावमध्ये जोरात सुरु आहे.
हा विवाह मालेगावातील संगमेश्वरमध्ये पार पडला, त्यानंतर या लग्नाची गोष्ट चांगलीच वायरल होत आहे. मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक पगारे यांचा मुलगा राहुल हा वयात आला तशी घरच्यांकडून वधू शोध मोहीम सुरु झाली. मात्र, त्यात उंची आडवी आली. राहुल याची उंची चार फूट सहा इंच. लग्न करताना अनेक बारकावे पाहिले जातात. नोकरी, धंदा, शेती, घरदार, रंग आणि उंची. सर्वकाही योग्य असले तरी सोयरीक जुळेलच याचीही काही शाश्वती नसते. तेव्हा आहेर कुटुंबापुढे मोठे आव्हान होते. त्यांची चांगलीच दमछाक झाली. पण म्हणतात ना, ‘रब ने बना दी जोडी’. तसाच काहीसा प्रयत्य आला. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, तशी राहुलला वंदना लाभली. जशी अवस्था आहेर कुटुंबाची तसाच अनुभव गारेगावमधील जगताप कुटुंब घेत होते. योग्य वर आणि वधू एवढा एकच समानधागा दोघांचा राहिला. कै. प्रभाकर मोतीराम जगताप यांची कन्या वंदना हिची उंचीही चार फूट. दोन्ही विश्वकर्मा समाजाचे असल्याने आप्त-नातेवाईकांच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबाची सोयरिक जुळली. वंदनाचे (२०) बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले तर राहुल (३०) हा खासगी दुकानात नोकरीला. पसंती होऊन बुधवारी थाटामाटात विवाह संपन्न झाला. या देखण्या सोहळ्याची एकच चर्चा होत आहे.
नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. वर्हाडींचा उत्साह दांडगा होता. नवरदेव-नवरीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. अक्षता पडल्या आणि एकच झुंबड उडाली. एरव्ही इतर लग्नात स्टेजवरुन खाणाखुणा झाल्या की फोटोसेशनसाठी एक-एक गट पुढे होता. मान्यवरांचे छायाचित्रण झाले की मग. पण या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या जोडप्याबरोबर फक्त फोटो नव्हे तर सेल्फी घेण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. जवळच्या आणि मानपानाच्या मान्यवरांनी तर दोघांना कडेवर घेत फोटो घेत ‘नांदा सौख्य भरे’च्या शुभेच्छा दिल्या. या लांबलेल्या कार्यक्रमांने अनेकांना ताटकळत उभे राहावे लागले, हे वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही. बघा लग्नाची धमाल या युट्युब लिंकवर
https://youtube.com/shorts/ZruHV6dZ2-M