कोची – तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून जनतेमधून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूबाबत फेसबुक पेजवर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईमने गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली. तर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजी सोशल मीडियावर पोस्ट केल्या. या कृत्यामुळे व्यथित होऊन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. तसेच, आम्ही हिंदू धर्माचा स्वीकार करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. अकबर हे मल्याळम चित्रपट दिग्दर्शक असून त्यांनी त्यांचे नवे नाव राम सिंग असेल हे सुद्धा घोषित केले आहे.
अली अकबर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली आहे. व्हिडिओत ते म्हणतात की, मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत आहे. आजपासून मी मुस्लीम नसून मी भारतीय आहे. भारताविरोधात स्माईली पोस्ट करणाऱ्या हजारो विरोधातील ही माझी प्रतिक्रिया आहे, असे अली यांनी स्पष्ट केले आहे.
अली अकबर यांनी देखील कमेंटसला प्रत्युत्तर देताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. त्यानंतर ती पोस्ट फेसबुकवरुन हटवली गेली. मात्र ती व्हॉटसअपवरुन शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर देखील सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून आले आहेत. काही जणांनी अली अकबर यांचे समर्थन केले आहे तर काही जणांनी त्यांच्या विरोधात कमेंट केल्या आहेत. अली अकबर भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते. मात्र, पक्ष नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला होता.