इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दरवर्षी 14 जानेवारीला येणारी मकर संक्रांत यंदा केव्हा साजरी करायची, असा प्रश्न असंख्य वाचकांनी विचारला आहे. त्यामुळे त्याविषयी जाणून घेणे अगत्याचे आहे. ज्योतिष शास्त्रीय मान्यतेनुसार सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत ज्या दिवशी प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. यंदा सूर्य १४ जानेवारीला रात्री ८.२१ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करीत आहे. उदय तिथी मान्यतेनुसार १४ जानेवारीला सूर्यास्ता नंतर (रात्री ८.२१) सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रीय सूर्य उदय तिथी मान्यतेनुसार सूर्याची उदय तिथी १५ जानेवारीला लागते. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला नदी अथवा पवित्र ठिकाणी स्नानाचे विशेष महत्त्व असल्याने स्नान हे सूर्य उदयालाच केले जाते. त्यामुळेच यंदा संक्रांत १५ जानेवारी म्हणजेच रविवार या दिवशी साजरी करावी…
यंदाची संक्रांत विशेष
यावेळच्या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवान अश्व आहे. ती कुमारीका स्वरूप असून दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली आहे. तर ईशान्येकडे बघत आहे. हातात शस्त्र म्हणून गदा घेतली आहे तर सुवासाला जाईचे फुल घेतले आहे. पीत वस्त्र धारण केलेले आहे.
संक्रांतीचा महापुण्यकाळ
यंदाच्या संक्रांतीचा स्नान दान त्याचप्रमाणे देव दर्शनासाठी महापुण्यकाल सकाळी ७ वाजून १५ मिनिटापासून नऊ वाजेपर्यंत आहे. पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे….
मकर संक्रांत दान
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गुळ, तांब्याचे दिवे, तांब्याची भांडी, वस्त्रपात्र दान, अन्नदान यास विशेष महत्त्व आहे.
संक्रांत पौराणिक महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. थंडी हळूहळू कमी होत जाऊन अल्हाददायक वसंत ऋतुची सुरुवात होते. याच दिवशी सूर्य आपल्या पुत्र तसेच मकर राशीचा स्वामी शनी याच्या भेटीस जातो, अशी आख्यायिका सांगितली जाते. सर्व प्रकारचे हिंदू सणवार मकर संक्रांती पासून सुरुवात होतात. मकर संक्रांती दिवशी घराला उंबरठा लावणे, शुभ मानले गेले आहे. सर्व हिंदू सणवार निसर्ग शास्त्राशी तसेच निसर्ग चक्राशी संबंधित असल्याने मकर संक्रांत या काळापर्यंत शेतातील बहुविध पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात. त्याचा आनंद म्हणून देखील मकर संक्रांत साजरी केली जाते.
मातीच्या सुगड्यांमध्ये ऊस, हरभरा, बोरे ,गाजर, तीळ, हलवा, हुरडा या वस्तू ठेवून देवाला नैवेद्य दाखवला जातो. महिला वर्गाचे हळदी- कुंकू कार्यक्रम मकरसंक्रांती पासून सुरू होऊन रथसप्तमी पर्यंत सुरू असतात.
हुरडा पार्टी
संक्रांतीच्या काळामध्ये सर्वत्र थंडीच्या वातावरणात शेकोट्या पेटवून शेतांमध्ये ऊस, बोरे, गाजर, कोवळा हरभरा, कोवळ्या कणसाचा ज्वारीचा हुरडा, ज्वारी बाजरीच्या भाकरी ,बेसन, पाटवड्याची आमटी, भरीत, ठेचा असा ग्रामीण रानमेवा मेनू असलेल्या हुरडा पार्टी रंगतात.
Makar Sankranti Festival Date Celebration Confusion