इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. दोन्ही गाड्यांची टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि तिचे अनेक डबे मालगाडीवर चढले. रेल्वेचे इंजिन मालगाडीच्या डब्यांवर चढल्याचे चित्रांमध्ये स्पष्ट दिसत आहे. या अपघातात ३०० प्रवासी ठार झाले तर १ हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या भीषण रेल्वे अपघातात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १ हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
प्रथम, हावडा-बेंगलोर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या ट्रॅकवर शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनचे डबेही रुळावरून घसरले आणि तेथून जाणाऱ्या मालगाडीला धडकले. रेल्वेचे इंजिन मालगाडीच्या डब्यांवर चढल्याचे चित्र दिसत आहे.
रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ओडिशा रेल्वे अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “पश्चिम बंगालमधून प्रवाशांना घेऊन जाणारी शालीमार-कोरोमंडल एक्स्प्रेस आज संध्याकाळी बालासोरजवळ मालगाडीला धडकली आणि आमचे काही (बंगाल) बाहेर जाणारे प्रवासी गंभीर जखमी/जखमी झाले हे ऐकून धक्का बसला,”. आमच्या लोकांच्या भल्यासाठी आम्ही ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहोत. आमची आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/22535185 या क्रमांकाने त्वरित कार्यान्वित करण्यात आला आहे.
बचाव, मदतीसाठी सर्व प्रयत्न सुरू झाले आहेत. ओडिशा सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी आम्ही ५-६ सदस्यांची टीम घटनास्थळी पाठवत आहोत. मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
या अपघातात अनेक प्रवासी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अडकल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्व गाड्या थांबवल्या आहेत. यासोबतच या अपघाताबाबत प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याच्या चौकशीसाठी RailMadad ने 044- 2535 4771 हा तात्पुरता हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री प्रमिला मल्लिक आणि विशेष मदत आयुक्त (SRC) यांना तातडीने अपघातस्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. मंत्री आणि एसआरसी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Major Railway Accident Coromandel Express