मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीची रणनीती महाविकास आघाडीने निश्चित केली आहे. या अंतर्गत राज्यातील ४८ जागांसाठी जुळवाजुळव झाली असून या अंतर्गत ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तेस्थापनेसाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी पुढेदेखील कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळात आघाडीने काही निवडणुका सोबत लढल्या. त्यानंतर ही आघाडी कायम ठेवायची की नाही, यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. परंतु, या सर्व शंका बाजूला सारत महाविकास आघाडीने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:चा फॉर्म्युला घोषित केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.
असे आहे जागावाटप
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यामधील मुंबईतील ०६ लोकसभा जागांपैकी ०४ जागा ठाकरे गट लढवेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १-१ जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
पाच ते सहा जागांवर अद्याप अनिश्चितता
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ पैकी ५ ते ६ जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केला आहे.भाजपने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
https://twitter.com/AUThackeray/status/1636002606047965184?s=20
Mahavikas Aghadi Politics Loksabha Election Seat Sharing