मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दंड थोपटले असून भाजपला जागा दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे आघाडीने जाहीर केले आहे. दोन्ही निवडणुका एकत्र लढविण्याची घोषणाही महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भातील माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांची काल (९ मार्च) मुंबईत बैठक झाली. रात्री झालेल्या बैठकीत बऱ्याच मुद्यांवर चर्चा झाली. यात राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कसबा पोटनिवडणुकीतील विजय, सध्या सुरू असलेले विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आदी मुद्यांवर नेत्यांची चर्चा झाली. त्याचवेळी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घ्यावयाचे निर्णयही चर्चेला आले.
भाजपच्या विरोधात भक्कमपणे उभे राहण्यासाठी धोरण आखण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुक एकत्र लढविण्याचा. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांचे एकत्र निवडणुक लढविण्यावर एकमत झालेले आहे. भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचे चे म्हणाले.
बैठकीत यांचा सहभाग
महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सहभाग होता. नेत्यांच्या बैठकीत बऱ्याच मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल
भारतात सध्या धर्म आणि जातीवर राजकारण सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जात, धर्म सांगावा लागत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याच्याशी आम्ही कधीही समझोता करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
Mahavikas Aghadi Loksabha Assembly Election Decision
Politics