नाशिक – शासनाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार दरवर्षी अक्षय तृतीयेला प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता 28 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत त्याचप्रमाणे साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रदान केला जातो. हा पुरस्कार वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने या समाजासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवक, कलावंत, संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी आहे. या पुरस्काराचे स्वरूप व्यक्तीसाठी रूपये 25 हजार रोख रक्कम, एक शाल किंवा साडी-खण आणि श्रीफळ असे आहे तर, संस्थेसाठी रूपये 51 हजार रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे आहे.
पुरस्कारासाठी शासनाच्या विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या 08 जून 2016 च्या शासननिर्णयातील नियमावलीनुसार माननीय मंत्री बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राजस्तरीय समिती गठीत करण्यात येते. समितीद्वारे राज्यातील एक व्यक्ती व एक संस्था यांची निवड करण्यात येते. पात्र व्यक्ती व संस्था यांनी परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह 3 प्रतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक यांच्या कार्यालयात 28 फेब्रुवारी 2022 अखेर सादर करावेत असे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक सुंदरसिंग वसावे यांनी कळविले आहे.