पाऊस केव्हा आणि कसा कोसळणार…
महाराष्ट्रासाठी असा आहे हवामान अंदाज…
पावसाचा जोर काहीसा कमी होणार
पण नंतर वाढणारही!
सध्या पडत असलेल्या पावसाची तीव्रता ही ४ दिवस म्हणजे उद्या सोमवार दि.११ सप्टेंबर ते गुरुवार दि. १४ सप्टेंबर पर्यन्त, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काहीशी कमी होवून ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणीच केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र जोरदार तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या ५ जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता ही कायम आहे, असे वाटते. त्यामुळे नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होवून धरणसाठा टक्केवारीतही वाढ होवु शकते, असे वाटते.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकतात. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रूपांतर कमी दाब क्षेत्रात होवु शकते. आणि त्यांच्या वायव्ये दिशेकडे भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे , श्रावणी पोळ्यानंतर म्हणजे शुक्रवार दि.१५ सप्टेंबर पासून आठवडाभर म्हणजे शनिवार दि. २३ सप्टेंबर पर्यन्त महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही दि.१७ ते २३ सप्टेंबर(रविवार ते शनिवार) दरम्यान ही शक्यता अधिक असु शकते, असे वाटते.
पहिली चक्रीय वाऱ्याची स्थिती १२ सप्टेंबरला तयार होण्याची शक्यता जाणवते. हे सर्व असले तरी चालु वर्ष हे ‘ एल-निनो’ चे आणि महाराष्ट्रासाठी सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी, ह्या पूर्वानुमानाचाही विसर पडू नये, असे वाटते.
विशेष एव्हढेच सांगावसे वाटते.
माणिकराव खुळे
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Weather Climate Rainfall Forecast