अवकाळीचे वातावरण आठवडाभर पण जोर विदर्भातच
गेल्या दीड महिन्यांपासून अवकाळी पावसाने राज्यात काहूर माजवले आहे. आता एप्रिल संपत आला तरी अवकाळीचे ढग काही दूर व्हायला तयार नाहीत. अवकाळीचे वातावरण आठवडाभर असले तरी आजपासून पुढील ४ दिवस म्हणजे सोमवार दि. १ मे पर्यन्त, संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवते.
मध्य महाराष्ट्रातील विशेषतः खानदेशातील अकराणी शहादा शिरपूर चोपडा यावल रावेर एदलाबाद परिसरात अवकाळीचे वातावरण अधिक जाणवेल. आज दि.२८ एप्रिलला गारपीटीची शक्यता ह्या भागात जाणवते. उर्वरित खान्देश नाशिक नगर पुणे सातारा जिल्ह्यात सोमवार दि.१ मे पर्यन्त तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर सांगली कोल्हापूर सोलापूर तीव्रता अधिक जाणवेल.आज दि.२८ एप्रिलला संपूर्ण मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही..
मुंबईसह कोकणात मात्र आज व उद्या तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तर रविवार दि.३० एप्रिल पासुन अवकाळीचे वातावरणही निवळू शकते.
मराठवाड्यात संपूर्ण आठवडा म्हणजे गुरुवार दि. ४ मे पर्यन्त अवकाळी वातावरण टिकून राहणार असले तरी आज व उद्या म्हणजे शनिवार दि.२९ एप्रिल २०२३ पर्यन्त मात्र पावसाची तीव्रता अधिक राहू शकते.
त्यातही विशेषतः नांदेड, लातूर धाराशिव जिल्ह्यात ह्या वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल.
विदर्भात मात्र संपूर्ण आठवडा म्हणजे गुरुवार दि. ४ मे पर्यन्त अवकाळी वातावरणासहित पावसाची तीव्रता अधिक राहून आज दि. २८ ते रविवार ३० एप्रिल ३ दिवस गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यातही विशेषतः यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया ह्या जिल्ह्यात अवकाळी वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल.
आज दि.२८ ते रविवार दि.३० एप्रिल पर्यन्त संपूर्ण विदर्भात जोरदार पावसासहीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ३ दिवसात म्हणजे रविवार ३० एप्रिलपर्यन्त महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू २ डिग्रीने सरासरीपेक्षा घसरून आल्हाददायक वाटेल. तर पुढील ५ दिवसात कोणत्याही उष्णतेच्या लाटीची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवत नाही.
बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोंवतालचा परिसरापर्यंत तेथे सुरु असलेल्या पश्चिमी प्रकोपातील साखळ्यामुळे पाऊस, बर्फवृष्टी, मधूनच गारपीट, इत्यादीमुळे आजपासुन ते मंगळवार २ मे पर्यन्त सध्याचे वातावरण गैरसोयीचे होवु शकते.
सिझननुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी (मार्च, एप्रिल, मे ३ महिने) ह्या सिझन मधील वारा खंडितता’ ही प्रणाली ठळक वैशिष्ठ्याची आहे. मात्र ह्या वर्षी तिचा कालावधी अधिक (५०) दिवस टिकून राहिला, व अजुनही आहे. शिवाय ह्या प्रणालीचा आस सरासरी जागेपेक्षा वायव्येकडे (उत्तर महाराष्ट्र ते तामिळनाडू पर्यन्त) दोलायनात झुकल्यामुळे महाराष्ट्रात ह्या वर्षी अवकाळीचा परिणाम अधिक जाणवला व अजुनही जाणवत आहे.
म्हणूनच ‘ वारा खंडितता’ ह्या प्रणालीचा प्रभाव अजुनही टिकून असल्यामुळे आज हवेचा निर्वात दाबाचा आस (ट्रफ) समुद्रसपाटीपासुन ९०० मीटर उंचीपर्यंत मालदीवपासुन अरबी समुद्राहून मध्य महाराष्ट्रपर्यन्त पसरलेला आहे. त्यामुळेच विदर्भासहित मध्य भारतात अवकाळी वातावरणाचा परिणाम सध्या जाणवत आहे.
पुढील पाच दिवसांसाठी जिल्हा निहाय हवामानाचा अंदाज व चेतावणी.
Districtwise weather forecast and warnings issued by IMD Mumbai for the next five days.@RMC_Mumbai @Hosalikar_KS #stayupdated #thunderstorm #hailstorm #lightening #BeSafe pic.twitter.com/HX8305KAHL
— Sakha Sanap (@SakhaSanap) April 28, 2023
इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Unseasonal Rainfall Forecast Climate Weather