नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू करुन तब्बल ९ वर्षे झाली तरी हे प्रकार अद्याप घटलेले नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या ९ वर्षात तब्बल दीड हजाराहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही या कायद्याबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.
डाॅ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला नऊ वर्ष पुर्ण झाले असून दीड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहे. हा कायदा केवळ हिंदु धर्मातील लोकांना लागू पडेल ,अशा आरोप काही लोकांनी केला होता. आजही करत आहे. पण हा कायदा सर्व धर्मासाठी लागू आहे.
पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात दाखल झाला आहे.पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे.त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविण्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.
नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे,करणी भानामती,जादूटोणा अथवा भूत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे,त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रींयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजून त्रास देणे, पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे.
काही हिंदुत्ववादी संतांनी रामकुंड येथे जमत जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, कायदा आणखी कडक व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहे. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डाॅ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे व ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.
Maharashtra Superstition FIR Lodged in Last Nine Years