मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबल पारितोषिक विजेते रिच रॉबर्ट्स, मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, MSSU च्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिस्टन टेक्निकल स्कुल, पहिला मजला, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या डिजिटल फलकाचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे राज्य सरकारची यासाठी असणारी भूमिका, पाठिंबा व भविष्यातील योजना तसेच कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संपूर्ण माहिती, उद्दिष्ट, ध्येय सविस्तरपणे सांगणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाचा प्रारंभ ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आला आहे. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगाशी संलग्न आहे.
Maharashtra Skill University Courses Starting