मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांच्या बंडानंतर आता जयंत पाटीलदेखील शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील अजितदादांच्या मांडीला मांडी लावून होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात दिसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास शरद पवार यांना हा अजून एक मोठा धक्का असणार आहे.
जयंत पाटील हे शरद पवारांच्या निकटवर्तीयांमपैकी एक आहेत. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जयंत पाटलांना अश्रू अनावर झाले होते. ही आठवण ताजी असतानाच अजितदादांना साथ देण्याची तयारी जयंत पाटलांनी चालविल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्या पक्षातील बंड थांबविता आले नाही. त्यानंतर आता जयंत पाटलांसोबत एक मोठा गट अजितदादांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. सध्या राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासारखे मातब्बर नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत पाटील यांनीदेखील अद्याप शरद पवारांची साथ सोडलेली नाही. मात्र, १५ ऑगस्टनंतर त्यांच्या रुपाने अजून एक मोठे बंड शरद पवारांना पचवावे लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा एक मोठा झटका पवारांना राहणार आहे.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाचीही चर्चा
नव्या होणाऱ्या भूकंपात शरद पवारांसोबत असलेले काहीजण अजितदादा गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. दरम्यान, विविध समाजमाध्यमांसह काही वृत्तवाहिन्यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही जाणार असल्याचा सूर व्यक्त केला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही घडामोडी सध्यातरी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चर्चा निराधार
राज्याचे राष्ट्रवादीचे समन्वयक शेखर माने यांनी या चर्चा निराधार आहेत. राज्यात महाविकास आघाडीची बैठक झाली असून या पार्श्वभूमीवर अशा चर्चा हेतुपुरस्सर उठवल्या जात आहेत. यापूर्वीही झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड म्हणतात
राजकीय घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,” जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही.” मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,”आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.
तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.
maharashtra politics updates week ncp bjp shinde group
jayant patil mla join