मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार एखादी कृती करतात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील राजकारणाला कामी लावतात. २ मे रोजी त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला असला तरीही त्यापूर्वीच भाकरी फिरवण्याचे संकेत देऊन साऱ्यांना कामाला लावले होते. आता त्यांनी राजीनामा मागे घेतला खरा पण भाकरी भवतीच्या राजकारणावरून आता तर्क वितर्क बांधण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडणार एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सत्तेत बसणार आणि अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार, अश्या वावड्या गेल्या महिन्याभरापासून उठत आहेत. यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचे बोलले जाते. दरम्यान, माध्यमांमध्ये याच बातम्या येत असताना शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी युवा नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे असे म्हणत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सूतोवाच केले.
पवारांची ही भाकरी चांगलीच गाजली. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावण्यात आले. त्यात एक अर्थ असाही होता की अजित पवारांकडे पक्षाचे नेतृत्व जाणार आणि त्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत बसणार. पण या वाक्याचा खरा अर्थ काय होता, हे पवारांनाच माहिती होते. आणि २ मे रोजी त्यांनी स्वतःच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी गणितेच फिसकटली. कारण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादीभवतीच फिरू लागले. त्यामुळे हा पवारांचा सुपरशॉट मानला जात आहे.
अशी कारणे असे अर्थ
शरद पवार यांनी राजीनामा देण्यामागची तर अनेक कारणे समजली जात आहेत. पण राजीनामा परत घेण्यामागची कारणेही तेवढीच आहेत. अचानक राजीनामा देऊन पक्षात अस्वस्थता निर्माण करणे आणि आपली पकड सिद्ध करून राजीनामा परत घेणे, हा त्यांचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसरे म्हणजे सुप्रियाला अध्यक्ष करून पुन्हा अजितच्याच हाती सूत्रे असती आणि पक्षाचे काय झाले असते याचा अंदाजही लावणे कठीण होता, त्यामुळे त्यांनी निर्णय फिरवल्याचे बोलले जात आहे. तर तिसरे म्हणजे आता राजीनामा देणे म्हणजे इतर पक्षांची ताकत वाढविणे आहे, याचा अंदाज आल्यावर त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे.
Maharashtra Politics Sharad Pawar NCP