मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भूमिका कायम राजकीय संभ्रम निर्माण करणारी राहिली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षावर टीका करायची आणि दुसरीकडे त्याच पक्षातील नेत्यांच्या कामाचे कौतुक करायचे. आता तर त्यांच्याच पक्षात फूट पडल्यामुळे रोज नवीन विधाने पुढे येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. आता त्रिशंकू सरकार राज्यात आहे. पण जाताना पक्षाचे नाव, चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटोही ते घेऊन गेलेत. नऊ मंत्र्यांसह चाळीस आमदार शरद पवारांची साथ सोडून गेले. त्यानंतर आतापर्यंत शरद पवारांच्या भूमिका कायम बदलत राहिल्या. त्यांनी कधी अजित पवार यांच्यावर टीका केली, तर कधी पक्षात फूट नसल्याचे सांगितले. एकीकडे न्यायालयात जाऊ म्हणाले आणि त्याचवेळी अजितदादांसोबत गुप्त बैठका घेतल्या. त्यामुळे सर्वाधिक संभ्रम कुणात निर्माण झाला असेल तर तो महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये. मात्र आता त्यांनी जे विधान केले आहे, ती आतापर्यंतची सर्वांत आक्रमक भूमिका मानली जात आहे. कारण माझी साथ सोडून गेलेल्या लोकांसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारे कायमची बंद आहेत, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला असेल. ‘जे गेलेत त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारे बंद झाली आहेत’, असे शरद पवार म्हणाले आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कामाला लागा
या बैठकीला राज्यभरातील आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काहींनी जुने लोक परत आले तर काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर ‘हे आता डोक्यातून काढून टाका, तुम्ही फक्त कामाला लागा. महाविकास आघाडीत आपल्या वाट्याला येणाऱ्या ७०-८० जागांवर विजय मिळविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करा,’ असा सल्ला शरद पवारांनी दिला.
इतका अट्टाहास का
जी२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत असा उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या पत्रावरही इंडिया ऐवजी भारत असाच उल्लेख आहे. नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का, असा सवाल शरद पवार यांनी केला.
Maharashtra Politics NCP Sharad Pawar on Rebel Leaders