मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहाटेची शपथ आणि एकनाथ शिंदे यांची बंडखोरी या दोन घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत धक्कादायक ठरल्या. या घटनांचा क्रम तर लोकांना हळूहळू कळला, पण ते कसे काय घडले यामागच्या कहाण्या गुप्तच आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी मात्र त्या बंडखोरीचे श्रेय अधिकाऱ्यांना दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा महिने पूर्ण झाले आहेत. या दहा महिन्यांमध्ये स्वतः शिंदे यांनी बंडखोरीच्या संदर्भातील अनेक कथा महाराष्ट्राला सांगितल्या. पण तरीही प्रत्येकवेळी नवी माहिती राजकीय चर्चांमधून येत असते. अलीकडेच एका माध्यम समूहाला मुलाखत देताना अजित पवार यांनी या बंडखोरीबद्दल आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी शिंदेंच्या बंडखोरीचे संपूर्ण श्रेय ठाण्याच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांना दिले आहे.
अजितदादा म्हणाले, ‘ठाणे जिल्ह्यात कोणते अधिकारी असावेत, हे ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त, ठाण्याचे आयुक्त, सहा नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक या साऱ्यांच्या नियुक्त्या शिंदेंनीच केल्या होत्या. त्यामुळे २० जूनला मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदेंना त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांनीच मदत केली. शिंदे आणि त्यांचे आमदार अगदी सुरक्षितरित्या मुंबईच्या बाहेर पडतील, याची पूर्ण काळजी या अधिकाऱ्यांनी घेतली.’ त्यानंतर सुरत, गुवाहाटी आणि गोवा याचा क्रम तर अख्ख्या देशाने बघितला. पण मुंबईहून सुरतपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक होता, असेच अजितदादांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे.
अजून कुठे दिसत नाही
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करत सुरतच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे असे कळल्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ‘शिंदे गटाच्या गाड्या जिथे असतील तिथनं परत वळवा आणि मातोश्रीवर आणा. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरे यांची सही असली तरीही ती करून घेण्याचं काम शिंदेंनी केलं होतं. त्यामुळे ते शिंदेंसोबत एकनिष्ठ राहिले. सर्व गाड्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर या अधिकाऱ्यांनी ‘अजून कुठेच काही दिसत नाही’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
आम्ही काहीच करू शकलो नाही
एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आम्हाला लागली होती. याबद्दल आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सांगत होतो. पण आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की, आम्ही काहीच करू शकलो नाही, असेही अजितदादा या मुलाखतीत म्हणाले.
Maharashtra Politics NCP Ajit Pawar on Eknath Shinde Surat Fly Away