मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे.
सध्या राजकीय वारे जोरात सुरू आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. जागांवर दावे करण्यास सुरुवात झाली आहे. अशात शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली आहे. सोबतच त्यांनी राज्यात लोकसभेच्या २२ जागांवर दावा केला आहे. याबाबत अधिक सांगताना किर्तीकर म्हणाले,‘राज्यात लोकसभेच्या २२ जागा शिवसेनेच्या आहेत. २०१९ साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.’
संजय राऊतांनी केला वार
भाजप आणि शिंदे गटावर दररोज सडकून टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी,‘फडफड करणाऱ्या कोंबड्यांच्या मानेवर भाजपा एकदाच सुरी फिरवेल. त्यांना लोकसभेला २२ नाहीतर ५ जागा जरी भेटल्या तरी खूप आहे. आम्ही मागील वेळी १९ जागांवर विजयी झालो होतो, आताही १९ जागांवर विजयी होणार आहे,’ असे वक्तव्य केले आहे.
Maharashtra Politics BJP Shinde Group Dispute