मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार अपात्रतेसंबंधित प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. लवकरच या संदर्भात निर्णय येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्याचा प्लान भाजपने तयार केल्याची माहिती आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केले. या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने यातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टामुळे आला वेग
सुप्रीम कोर्टाने यापूर्वी विधानसभा अध्यक्षांवर चांगलेच ताशेरे ओढले. पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदार अपात्र प्रकरणात निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता कारवाईला वेग दिला आहे.
Maharashtra Politics 16 MLA Disqualification BJP Plan B