इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हृदयरोगाचा झटका येणे नवीन राहिलेले नाही. भारतात बहुतांश मध्यमवयीन, वृद्ध व्यक्तींना हृदयरोगाचा त्रास आहे. गेल्या दशकभरामध्ये युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अगदी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूल येथे केमिस्ट्रीचा क्लास सुरू असताना नववीत शिकणारा विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला. मुलाला उचलून टेबलावर ठेवले, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की मुलाला हार्ट अटॅक आला होता, त्याला सीपीआर देखील देण्यात आला होता, तरीही त्याला वाचवता आले नाही. या घटनेचे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
लखनौचे केमिस्ट्रीचे शिक्षक नवीन कुमार यांनी सांगितले की, ते केमिस्ट्रीचा क्लास घेण्यासाठी गेले होते. ज्या मुलांना अभ्यासासंबंधित काही समस्या होत्या त्यांच्या शंकांच निरसन करत होतो. यावेळी नववीचा विद्यार्थी आतिफ सिद्दीकी हा सेल्फ स्टडी करत होता. सेल्फ स्टडी करत असताना अचानक तो बेशुद्ध पडला. मी लगेच त्याला उचलून टेबलावर ठेवले आणि शाळेच्या नर्सला बोलावले. शाळेच्या नर्सने येऊन पाहिले आणि मुलाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्याला आरुषी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ताबडतोब मुलाला लारी मेडिकल सेंटरमध्ये घेऊन जा, असे सांगितले. यानंतर आम्ही लारी मेडिकल सेंटरमध्ये गेलो.
शाळेने दाखविली तत्परता
शाळेतील शिक्षक आणि नर्स ताबडतोब इयत्ता नववीतल्या आतिफ सिद्दीकी या विद्यार्थ्याला त्यांच्या कारमध्ये वैद्यकीय केंद्रात घेऊन गेले, तोपर्यंत मुलाच्या वडिलांनाही फोनवरून माहिती दिण्यात आली. तेही आरुषी मेडिकल सेंटरमध्ये पोहोचले. तिथे डॉक्टरांनी मुलाला सीपीआर दिला, मात्र त्यानंतरही मुलाला शुद्ध आली नाही, अशी माहिती सीएमएस शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कश्यप यांनी दिली.
Uttar Pradesh Lucknow Class Student Collapse Death
Heart Attack