नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवड्यात कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने जोरदार बॅटींग केल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. आजच्या सुनावणीत तर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
ज्या व्यक्तीकडे बहुमत नाही त्याला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का, असा सवाल त्यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला. नीरज कौल यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे १३ सदस्य गैरहजर होते. असे कसे शक्य आहे? आपल्याच पक्षातील सदस्यांचा विश्वास नसेल तर काय अर्थ आहे. अपात्रतेच्या प्रकरणातील ४२ सदस्य वगळले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नव्हते. अशावेळी त्यांना बहुमत नसताना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का?’ आज त्यांनी शिंदे गटाच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत वाचून दाखवली. उद्या अर्थात गुरुवारी सकाळी पहिला एक तास नीरज कौल युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतील. मध्यंतरापूर्वी सॉलिसीटर जनरल हरीश साळवे यांचा युक्तिवाद होईल. तर मध्यंतरानंतर कपिल सिब्बल रिजॉईंडर सादर करणार आहेत. एकूणच सर्वोच्च न्यायायालयाचा सलग दुसरा आठवडा जोरदार युक्तिवादाने रंगणार आहे.
न्यायालयाचा सवाल
बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप सदस्यांनी पाळायला हवा होता. मग तो का पाळला गेला नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने कौल यांना केला. त्यावर बहुमत आणि व्हीप बघून अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो, असे कौल म्हणाले.
म्हणून शिंदेंना संधी
अध्यक्षांनी त्या ३९ आमदारांवर कारवाई केली असती तर महाविकास आघाडीचे सरकारच अस्तित्वात राहिले नसते. पण तसे झाले असते तर चित्र वेगळे असते. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवू शकले नाही, त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्यांचा शपथविधी होऊ शकला, हा दावा एका अर्थाने बरोबर आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.
Maharashtra Political Crisis Supreme Court Shinde Group