नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत विविध जोरदार युक्तिवाद, निवडणुक आयोगाचे निकाल आदी घटनांमुळे सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी गाजत होती. आता न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
शिंदे गटाने शिवसेना सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली तेव्हापासून ही सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ही सुनावणी ऐतिहासिक मानली जात आहे. 14 फेब्रुवारी 2023 पासून 12 दिवस सुनावणी झाली. या काळात 48 तास कामकाज झाले. पहिले 3 दिवस प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर मागील 9 दिवसांपासून दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. 9 महिन्यानंतर सुनावणी सुरू झाली होती. आता साऱ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यानच्या काळात ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि हरीश साळवे यांनी केलेले युक्तिवाद देशभर चर्चेचा विषय ठरले होते. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा भावनिक एंड आणि हरीश साळवे यांची सरप्राईज एन्ट्री झाल्यानंतर धुवांधार बॅटींग सुनावणीतील महत्त्वाचे टप्पे ठरले. उद्धव ठाकरे यांच्यातर्फे राज्यपालांची आणि एकनाथ शिंदे यांनी उचललेले पाऊल कसे चुकीचे आहे, हे सांगण्यात आले. तर शिंदे गटातर्फे प्रत्येक पाऊल कायद्यानुसार उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता दोन्ही गटांच्या युक्तिवादावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
पक्षचिन्हावरील सुनावणी पुढे
निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आणि पक्षचिन्ह यावरील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.
कोकीळ आणि कावळा
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी संस्कृत सुभाषिताने युक्तिवादाचा शेवट केला. कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो, पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं… कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो…असे देवदत्त कामत यांनी युक्तीवादाच्या अखेरीस म्हटले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ऐतिहासिक सुनावणी अखेर पूर्ण
14 फेब्रुवारी पासून 12 दिवस, 48 तास कामकाज
पहिले 3 दिवस प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद
9 महिन्यानंतर सुनावणी सुरू झाली
आता साऱ्या देशाचे लक्ष निकालाकडे.कधी लागणार?काय असेल?
— Prashant Kadam (@_prashantkadam) March 16, 2023
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Complete