मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही अर्धे युद्ध जिंकले आहे. मात्र, नैतिकतेच्या मुद्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत तयार झालेला सॉफ्ट कॉर्नर आणि सर्वोच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांच्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास शिंदे सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही बाजूने स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गट न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने कसा, यासाठी कागदपत्रे हातात घेऊन युक्तीवाद करताहेत. घटनापीठाचा निकाल आपल्याच बाजूने आहे, असा आभास ठाकरे व शिंदे गटाकडून निर्माण करण्यात आला असला तरी दोघांनीही अर्धी लढाई जिंकली आहे. कोणाचा व्हिप किंवा पक्षप्रतोद अधिकृत, मूळ शिवसेना कोणाची, आमदार अपात्रता यांसह प्रमुख मुद्द्यावर न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही प्रश्न कायम असून पुन्हा कायदेशीर मुद्द्यांवर दोन्ही गटांना विधिमंडळ, निवडणूक आयोग आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयात पुढील काही काळ लढावे लागणार आहे.
जेव्हा एखाद्या पक्षात फूट पडते, तेव्हा त्यातील कोणतेही गट मूळ पक्ष म्हणून दावा करू शकत नाहीत. शिवसेनेतही फूट पडल्यावर केवळ लोकप्रतिनिधींची संख्या पाहून शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता व निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनापीठाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिल्यास किंवा आयोगाने ठाकरे गटाच्या याचिकेवर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय दिल्यास शिंदे गटापुढे अडचण निर्माण होऊ शकते. आयोगापुढे पुन्हा सुनावणी होऊन निर्णय होण्यास बराच कालावधी लागेल. त्यादरम्यानच्या काळात विधिमंडळ कामकाजात व्हिप कोणाचा अधिकृत असेल, यावर राजकीय वादंग निर्माण होतील.
राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
शिंदे गटातील आमदारांनी पत्र दिल्यावर कोश्यारी यांनी ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला लावणे बेकायदेशीर असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिंदे गटातील आमदारांचे बंड हा पक्षांतर्गत प्रश्न असताना त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचा निष्कर्ष राज्यपालांनी काढला. त्याचबरोबर विधानसभा प्रतोद (व्हिप) नेमण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Political Crisis Shinde Thackeray Fight Analysis