नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षाचा फैसला उद्या, ११ मे रोजी होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या निकालाकडे लागले आहे. यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून आहे. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जर विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपविला तर काय होईल, अशीही चर्चा सुरू आहे. याबाबत आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाचा निकाल उद्या लागणार आहे. उपाध्यक्ष झिरवाळ म्हणाले की, शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार माझाच आहे. आणि हे १६ आमदार अपात्र झाल्यानंतर हे सरकार कोसळणारच असा दावा झिरवाळ यांनी केला आहे.
झिरवाळ म्हणाले की, बंडखोर आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया सुरू होती तेव्हा अध्यक्ष म्हणून नार्वेकर सभागृहात नव्हते. दोन्ही पद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद माझ्याकडेच होतं, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मी दिला आहे. अजूनही मी त्या जागेवर आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे संवैधानिक आहे. त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येणार आहे. तत्कालीन अध्यक्ष म्हणून हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा असेल असा दावाही झिरवाळ यांनी केला आहे.
झिरवाळ पुढे म्हणाले की, हा महाराष्ट्रापुरता निर्णय नाही तर या निकालाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे. जेव्हा १६ आमदारांना अपात्र केलं गेलं तेव्हा मी कुठल्याही आकसापोटी हा निर्णय घेतला नाही. तर कायद्याच्या आधारेच या आमदारांना अपात्र केले. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, हे सरकार पडणारच आहे. कारण, जेव्हा सरकारमधला प्रमुख अपात्र ठरतो तेव्हा सरकारचा विषयच राहत नाही, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
maharashtra political Crisis Assembly DySpeaker Zirwal