मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली.
महाराष्ट्र एनसीसीने आजवर १७ वेळा प्रतिष्ठित असे पंतप्रधानांचे निशाण पटकावले आहे, अनेकदा राज्य एनसीसी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आली आहे. यंदा अनेक सांघिक प्रकारांमध्ये राज्यातील कॅडेट्सनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याच्या कॅडेटने प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एनसीसी आजही देशात सर्वोत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. मात्र पंतप्रधानांचे निशाण पुन्हा प्राप्त करण्यासाठी एनसीसीने नव्या उत्साहाने तयारीला लागावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
जीवनात एनसीसीचा युनिफॉर्म घालण्यास भाग्य लागते, असे सांगून आपण स्वतः सव्वा चार वर्षे एनसीसी छात्र होतो असे राज्यपालांनी सांगितले. एकदा तुम्ही एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केले की आयुष्यभर तुम्ही शिस्तीने जीवन जगता असे सांगून ‘विकसित भारत’ साकार करण्यासाठी सर्वच क्षेत्रात शिस्तीची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आपण सशक्त असलो तर आपण मानवतेची सेवा करू शकतो असे सांगून एनसीसी प्रशिक्षित युवकांनी नशेसाठी वाढत्या ड्रग्स वापराविरोधात जनजागृती करावी तसेच वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण आदी कार्यात भाग घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले.
जगातील प्रत्येक धर्म चांगला असून युवकांनी इतर धर्मांचा आदर करावा असे सांगताना युवकांनी धर्माबाबत कट्टरतावादी होऊ नये अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एनसीसीच्या विविध जिल्ह्यांमधील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांनी राज्यातील कॅडेट्सनी जिंकून आणलेल्या चषकांची पाहणी केली व विजयी कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली.
महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांनी राज्यपालांचे स्वागत केले, तर कर्नल एम डी मुथप्पा यांनी प्रजासत्ताक दिन कॅडेट्स निवड प्रक्रिया व शिबीराच्या पूर्वतयारीची माहिती दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी झालेले राज्यातील 124 कॅडेट्स, प्रशिक्षक, तसेच महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंदाची पदक तालिका
१. सर्वोत्कृष्ट नेव्हल विंग
२. एअर विंग – द्वितीय क्रमांक
३. बेस्ट कॅडेट
४. सर्वोत्कृष्ट संचालनालय – हवाई उड्डाण
५. सर्वोत्कृष्ट संचालनालय – एअर विंग स्पर्धा
६. सर्वात कृतिशील नेव्हल युनिट
७ परेड कमांडर एनसीसी तुकडी कर्तव्य पथ