मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजप यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, काँग्रसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसतर्फे प्रज्ञा सातव
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना काँग्रसने उमेदवारी निश्चित केली आहे. तशी घोषणा नेते मुकुल वासनिक यांनी केली आहे. सातव यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभेवर पाठविले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, काँग्रेसने त्यावेळी संधी दिली नाही. आता शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
भाजपतर्फे संजय केनेकर
विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले आणि तशी शिफारस केली.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून मा. संजय केनेकर यांची उमेदवारी लवकरच निश्चित होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत १६ नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येईल. भारतीय जनता पार्टी विधानसभा सदस्यांमार्फत होणारी ही निवडणूक पूर्ण सामर्थ्यानिशी लढेल आणि जिंकेल, असा विश्वास मा. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1460120873206116356