मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने लेक लाडकी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कन्येचा जन्म झालेल्या कुटुंबाला थेट पैसे दिले जाणार आहेत. या योजनेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याशिवाय महिलांसाठी राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. त्याचा प्रत्यक्ष लाभ महिलांना आता मिळणार आहे.
‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येणार असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये, पहिलीत चार हजार रुपये, सहावीत 6 हजार रुपये, तर अकरावीत 8 हजार रुपये या टप्प्याने मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1633770019799662594?s=20
नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा वाढवून २५ हजार रूपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत असणार आहे. तसेच शासन लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. त्यासोबतच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल.
‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिल्या जातील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra Government New Scheme Girl Family Direct Money