शौर्यपदक विजेते मेजर साकलकर यांना ६ लाख रूपये अनुदान मंजूर
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक अथवा सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शौर्यपदक अथवा सेवापदक प्राप्त करणाऱ्या सैन्यातील जवानांना अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत परम विशिष्ट सेवेसाठी शौर्यपदक विजेते नागपूर येथील मेजर प्रतर्दन गोपाळ साकलकर यांना शासनाने 6 लाख रूपये अनुदान मंजूर केले आहे. मेजर साकलकर यांना 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे.
गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खालापूर (जि. रायगड) पोलीस ठाणेअंतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावर ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला. या अपघातात त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २५ लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गृहरक्षक दलाच्या जवानांना विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील ४६ हजार ३३४ जवानांचे बचत खाते उघडून त्यांना विमा संरक्षण व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री. आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना मदतीचा धनादेश अनुज्ञेय झाला.
यावेळी अपर पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक अतुल उत्तमराव झेंडे, एचडीएफसी बँकेचे संदीप कोचर, क्लेम सेटलमेंट व्यवस्थापक मंजरी सावंत आदी उपस्थित होते.
Maharashtra Government Help to Major and Home Guard