पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील वीजग्राहकांना महावितरणने मोठा जबर ‘शॉक’ दिला आहे. पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. दोन वर्षांचा हिशेब मांडून ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. अभूतपूर्व विक्रमी अशा या वीजदरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. तर, या वीजदरवाढीमुळे औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्वच प्रकारच्या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. परिणामी, एकूणच महागाई वाढीला चालना मिळणार आहे.
महावितरणने आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी केली आहे. प्रत्यक्षात ही दरवाढ ३७ टक्के असल्यावर ग्राहक संघटना ठाम आहेत. इलेक्ट्रिसिटी ड्यूटी एकूण वीज आकारावर घरगुती वीज ग्राहकांना १६ टक्के, व्यापारी वीज ग्राहकांना २१ टक्के, औद्योगिक वीज ग्राहकांना ७.५ टक्के भरावी लागेल. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना ही दरवाढ शॉक देणारी आहे. येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी ही वीज दरवाढ असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.
दरवाढ अशी
ग्राहक वर्गवारी….. सध्याचे दर…….. २०२३-२४…… २०२४- २५
० ते १०० युनिटस्…… ३.३६…… ४.५०…… ५.१० रुपये
१०१ ते ३०० युनिटस्…… ७.३४ १० ११.५० रुपये
३०१ ते ५०० युनिटस्…… १०.३७…… १४.२०…… १६.३० रुपये
५०० युनिटस् वर…… ११.८६…… १६.३०…… १८.७० रुपये
धूळफेक
२०२३-२४ मध्ये ८.९० रुपये प्रति युनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी आहे. सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के दाखविली आहे. महावितरणने मांडलेले गणित म्हणजे ग्राहकांच्या डोळ्यांत केलेली ही धूळफेक आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के आहे. १० टक्क्यांवर दरवाढ हा टॅरिफ शॉक ठरतो. त्यामुळे १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करताच येऊ शकत नाही. यानंतरही साऱ्या संकेतांचे उल्लंघन करीत महावितरणने याचिका दाखल केली असल्याचे प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Electricity Rate Hike Consumer Affect