मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रांवर परिणाम केला. शाळासुद्धा दीर्घकाळ कुलूप बंद राहिल्या. परिणामी विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढही कही झाली. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभरात ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) सर्वेक्षण केले. त्यात पाचवीतील तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी करता आली नाही तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार आलाच नाही. बिघडलेल्या शैक्षणिक गणिताने विद्यार्थ्यांना घाम फोडला असून ही पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. देशभरात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी देखील वाचता आले नाही. करोनाकाळापूर्वीच्या तुलनेत किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्यापेक्षा कमी आहे, तर १५-१६ वयोगटातील म्हणजे माध्यमिक वर्गातील साधारण १.५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.
वाचनात अडचणी
दुसरीच्या विद्यार्थ्यांना दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद वाचता येणे अपेक्षित आहे. पण, पाचवीतील साधारणतः ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत. ढासळलेली शैक्षणिक स्थिती चिंतेची बाब असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
गणित विस्कटले
पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करण्याचे गणित अवघ्या १९.६ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. यापूर्वी असे गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३०.२ टक्के होते. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. आठवीतील केवळ ३४.६ टक्के विद्यार्थ्यांनाच हे गणित सोडविता आले. यापूर्वी हेच प्रमाण ४०.७ टक्के होते.
Maharashtra Education School Students Performance