इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षांत वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. कधी कुठला ऋतू सुरू होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत असताना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवन असह्य झाले आहे. अशातच आता एल निनोमुळे राज्यावर दुष्काळाचे संकट असल्याचा इशारा नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिला आहे.
सध्या अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागाला झोडपले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. अशातच आता ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापतं. यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढते. त्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळं हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळे भारतात पाऊसमान कमी होते.
एल निनोचा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. एल निनोमुळे मान्सूनच नाही तर हिवाळा देखील उबदार होतो. तसेच उन्हाळा देखील आणखी गरम होतो. एका अहवालानुसार भारताने २००२, २००४, २००९ आणि २०१२ या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
राज्य सरकार नियोजनाच्या तयारीत
जर यावर्षी कमी पाऊस पडला तर काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात मुख्य सचिवांना बैठक घ्यायला सांगितली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात बोलताना दिली. त्यामुळे येणाऱ्या परिस्थितील तोंड देण्यासाठी राज्य सरकार तयारीत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Drought Summer Heat Wave Forecast Climate Weather