नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिकने बीडवर १ डाव व ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महात्मानगर क्रिकेट मैदानावर स्टार , पुणेनेही नंदुरबार विरुद्ध १ डाव व २२१ धावांनी मोठा विजय मिळवला.आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकत नाशिक संघ गट विजेता ठरला.
गोल्फ क्लबवर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी घेतलेल्या बीडने पहिल्या डावात १२६ धावा केल्या. नाशिकच्या व्यंकटेश बेहरेने ४ व मंथन पिंगळेने २ बळी घेतले. उत्तरदाखल नाशिकने ज्ञानदीप गवळी १०३ व ऋग्वेद जाधव ९६ व व्यंकटेश बेहरे नाबाद ५० यांच्या जोरावर ९ बाद ३८१ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी बीडला १६८ धावांत सर्वबाद करत मोठा विजय मिळवला. मंथन पिंगळेने ५ तर हुजेफा मर्चंटने २ गडी बाद केले.
तर महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्या सामन्यात प्रथम फलंदाजी घेतलेल्या स्टार , पुणे ने पहिल्या डावात २७९ धावा केल्या. आर्यन लोंढे ने ७३ व झिदान मंगाने ६१ धावा केल्या. स्टार , पुणे च्या आर्यन घोडकेने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत ७ बळी घेतले व नंदुरबारला केवळ १९ धावांत गुंडाळले. फॉलोऑन नंतरही दुसऱ्या डावात नंदुरबारला १९ धावांत सर्वबाद करत दणदणीत विजय मिळवला. स्टारच्या सर्वेश होन राव ने ६ तर आर्यन घोडकेने ३ गडी बाद केले.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर साखळी स्पर्धा झाली . नाशिक संघ जी गटात अव्वल ठरला. सर्व सामने जिंकणाऱ्या नाशिक संघाचे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी शाबासकी देत खास अभिनंदन केले आहे.
Maharashtra Cricket Test Match Nashik Win