इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सात जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – वर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांची टॅलेंट हंट समिति मध्ये निवड झाली आहे. समीर रकटे यांनी यापूर्वी सलग आठ वर्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धा समिती सदस्य म्हणून काम बघितले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य संजय परिडा यांची स्पर्धा समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
नाशिकचे तीन माजी रणजीपटू पुढीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्त झाले आहेत: सलिल आघारकर महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणून पहिल्यांदाच निवड झाली तर अमित पाटील १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली असून सुयश बुरकुल ची १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रशिक्षक पदी निवड झाली,तर मूळचे नाशिककर पण गोवा संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा गाजवलेले अविनाश आवारे रणजी सहायक प्रशिक्षक होत आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या महिला खेळाडु संघ प्रशिक्षक भावना गवळी ह्यांची १५ वर्षांखालील महिला संघ व्यवस्थापक पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांनी कामकाज सुरु केल्या नंतर विविध समित्यांची निवड करून जाहीर केली आहे. त्यात नाशिक च्या समीर रकटे यांच्या सोबत नविन सहा जणांना संधी मिळाली आहे. यापूर्वी ही नाशिकचे सहा जण अनेक वर्षांपासून विविध समितींवर काम करत होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ह्या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra Cricket Assosiation Commitees Nashik 7 Persons