मुंबई – राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये तब्बल २६ हजार ५३८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळेच राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने हजारो नवे रुग्ण सापडत असल्याने ही बाब काळजीत टाकणारी आहे. राज्यात आज दिवसभरात १४४ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ७९७ झाली आहे. तर, ३३ रुग्णांनी आतापर्यंत ओमिक्रॉनवर मात केली आहे.
गेल्या काही दिवसातील कोरोना बाधितांची संख्या खरोखरच चिंता करायला लावणारी आहे. १ जानेवारीला ९, १७० रुग्ण, २ जानेवारीला ११, ८७७ रुग्ण, ३ जानेवारीला १२, १६० रुग्ण तर ४ जानेवारीला १८, ४६६ रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज दिवसभरात ८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुंबईतील स्थिती अतिशय बिकट होताना दिसत आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये तब्बल १५ हजार १६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सक्रीय रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ९२३ एवढी झाली आहे.