नाशिक – वाघाडी नदी काठावर एका अज्ञात ४० ते ४५ वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओळख पटू नये म्हणून सदर व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेवण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर महिन्याला एक खुनाची घटना घडत आहे. मागील महिन्यात हिरावाडी परिसरात पाच भावंडांनी जुन्या वादातून एकाची भोसकून हत्या केल्याची घटना ताजी आहे. यातच बुधवारी (दि.५) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हिरावाडी परिसराच्या मागील भागात असलेल्या वाघाडी नदी काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर व्यक्तिची ओळख पटू नये यासाठी वजनी वस्तूने या व्यक्तिचा चेहरा ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. आढळून आलेली व्यक्ती दोन दिवसांपूर्वी याठिकाणी पाय घसरून पडली असावी. तोंडाला जबर मार लागल्याने ही व्यक्ती मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके कारण समजू शकणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.कोल्हे यांनी सांगितले.