मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात तिसरी लाट सक्रीय झाल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. कारण, आज दिवसभरात तब्बल ४१ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. रुग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला तर परिस्थिती अतिशय चिंताजनक होण्याची चिन्हे वर्तविली जात आहे.
आज दिवसभरात ९ हजार ६७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र, तब्बल ४१ हजार १३४ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हजारोच्या संख्येने नवे बाधित सापडत असल्याने आणखीनच चिंता वाढत आहे. ओमिक्रॉनच्या अवताराने राज्यामध्ये चिंता वाढवली असून वाढीचा हा वेग रोखण्याचे मोठे आव्हान आहे. राज्यात आद दिवसभरामध्ये १३३ ओमिक्रॉन बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांची संख्या १००९ वर गेली आहे. आजवर ४३९ ओमिक्रॉन रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज दिवसभरात १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा २.०७ टक्के झाला आहे.
मुंबईतही आज दिवसभरात २० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णांचा आकडा हा हजारोंच्या संख्येतच आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसातील रुग्ण संख्या अशी
१ जानेवारी – ९,१७०
२ जानेवारी – ११,८७७
३ जानेवारी – १२, १६०
४ जानेवारी – १८, ४६६
५ जानेवारी – २६, ५३८
६ जानेवारी – ३६, २६५
७ जानेवारी – ४०, ९२५
८ जानेवारी – ४१, १३४