मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अखेर आणखी १५ दिवस लॉकडाऊन कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता येत्या १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईनरित्या झाली. या बैठकीत १५ दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अगोदर ३० एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्याकडे केली. तर तज्ज्ञांनी सुद्धा १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो असे सांगितले. त्यामुळे हा लॅाकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तो कमी करावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.