मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परीक्षा आटोपल्यावर शाळा विद्यार्थ्याच्या हाती रिपोर्टकार्ड देते. त्यातील बहुतांश निकाल विद्यार्थ्याला माहिती असतो. कारण आपण कुठे चुका केल्या आणि कुठे चांगले होतो, याचा पूर्ण अंदाज त्याला असतो. मात्र असे समजा की परीक्षाच झाली नाही आणि थेट वर्षभराच्या कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्याच्या हाती रिपोर्ट कार्ड दिले तर काय होईल? अगदी तशीच स्थिती सध्या राज्यातील भाजपच्या आमदारांची आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये भाजपच्या आमदारांची कामगिरी कशी होती, याचा रिपोर्ट कार्डच राज्यातील श्रेष्ठींनी तयार केला आणि तोच रिपोर्ट कार्ड भाजप आमदारांच्या हाती दिला. एका आमदाराचा रिपोर्ट कार्ड तब्बल ६० पानांचा आहे. त्यात लिहीलेल्या बारीकसारीक गोष्टी वाचून तर आमदारांच्याही भूवया उंचावल्या. कारण तुम्ही काय केले, तुम्ही सध्या काय करताय, कुणासोबत भांडण आहे, कुणावर मेहेरबान आहात येथपासून तर जनतेच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत, येथपर्यंत प्रत्येक गोष्ट या रिपोर्ट कार्डमध्ये नमूद आहे. हे वाचून आमदारच बुचकाळ्यात पडले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून घेतले. या सर्वेक्षणात प्रत्येक मुद्दा निःपक्ष पद्धतीने पुढे आला. विशेष म्हणजे त्याशिवाय स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आदींच्या माध्यमातून संबंधित आमदाराची माहिती काढण्यात आली. त्या आधारावर हा रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आला. मात्र हे सारे कधी घडले याची कल्पनाही आमदारांना नव्हती.
अजून वेळ गेलेला नाही
आमदारांच्या चुकाही यात नमूद करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आपण केलेल्या चुका सुधारण्याची संधी आहे. त्या वेळीच सुधारण्याची तंबी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी आणि शिवसेना मित्र पक्ष असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्याशी असलेले मतभेद मिटवून एकत्र काम करा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
प्रत्यक्षच भेटले
रिपोर्ट कार्ड तयार झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि लोकसभा निवडणुक समन्वयक आमदार श्रीकांत भारतीय यांनी सर्व आमदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. याशिवाय प्रत्येक विभागाची बैठक घेण्यात आली. एवढेच नव्हे तर फडणवीस आणि बावनकुळे यांनी प्रत्येक आमदाराची मुलाखत घेऊन त्याला चुकांची जाणीव करून दिली.
Maharashtra BJP Politics MLA Report Card Election Performance