मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भटक्या, मोकाट, बेवारस कुत्र्यांना दत्तक घेण्यासंदर्भात राज्य सरकार विशेष योजना आणण्याच्या विचारात आहे. या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. त्यानंतर ही योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
मोकाट कुत्र्यांची वाढत्या संख्येची समस्या सर्व शहरांमध्ये आहे. राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. रात्री-अपरात्री वाहनामागे धावणाऱ्या कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे. बऱ्याच ठिकाणी कुत्र्यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना विष पाजून मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही जण या मुक्या जनावरांना बेदम मारहाणदेखील करतात. या पार्श्वभूमीवर मोकाट श्वानांना हक्काचे पालक मिळावे तसेच कुत्र्यांपासून नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी सरकारची नवीन योजना उपयोगी ठरू शकणार आहे. या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून लोकांना वाचवा अशी मागणी त्यांनी केली. संजय केळकर, सुनील टिंगरे यांनी मोकाट कुत्रे सामाजिक वा प्राणीप्रेमी संस्थांना दत्तक देण्याची योजना आखा, अशी मागणी केली. मनेका गांधींचे नाव घेऊन धमक्या देतात; ते थांबवाकाही प्राणीप्रेमी लोक मनेका गांधी यांचे नाव घेऊन धमक्या देत असतात. त्यांना रोखा. माझ्या मतदारसंघातील एका हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर कुत्रा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला, असे भाजपच्या मनीषा चौधरी म्हणाल्या होत्या. या मागणीवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या नवीन योजनेबद्दल सांगितले.
बच्चू कडुंची मजेशीर सूचना
मोकाट कुत्र्यांना आसामला न्या. गुवाहाटीला गेलो तेव्हा माहिती मिळाली की तिकडे कुत्रे खातात. त्यामुळे कुत्र्यांना तिकडे सात, आठ हजार रुपयांचा भाव असतो. तिथल्या सरकारशी बोला आणि इकडचे सगळे मोकाट कुत्रे तिकडे नेऊन विका, अशी मजेशीर सूचना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
Maharashtra Assembly Street Dog Discussion Government Scheme