मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये मिळालेच पाहिजे…अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा
महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक!महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.#अर्थसंकल्पीयअधिवेशन pic.twitter.com/JHwlcmDGqT
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 17, 2023
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते
अजित पवार सभागृहात आक्रमक
राज्यात अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
दरम्यान राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी काहीही विधाने करुन ‘अकलेचे तारे’ तोडत असल्याचे सांगून कृषीमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यात दिनांक ५,६ व ७ मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु झालेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे.
आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’ तर ११ जिल्ह्यांना ‘ऑरेज ॲलर्ट’ देण्यात आलेला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन ‘अकलेचे तारे’ तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत याबाबत अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरु करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.
Maharashtra Assembly Session Farmer Compensation Agitation