मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या मुंबई-गांधीनगर आणि नागपूर-बिलासपूर या दोन मार्गांवर सध्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. आणि आता पुढील आठवड्यापासून महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सीएसएमटी (मुंबई) -साईनगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. नव्या सेवेमुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत एका समुदायाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी येणार आहेत. त्याच वेळी सीएसएमटी येथे १५ मिनिटांचा वंदे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून पाच तास ५५ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.
१६ डबे, १,१२८ प्रवासी क्षमता
देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत. प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ एसी डबे आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे.
असे आहे वेळापत्रक
सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आठवडय़ातील सहा दिवस धावणार (गुरुवार वगळता) असून ५ तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे. सीएसएमटीतून सायंकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे. याच प्रमाणे सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवडय़ातील सहा दिवस धावेल. (बुधवार वगळता). सोलापूर येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.
वंदे भारत एक्प्रेसची वैशिष्ट्ये
वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि अधिक गतीचा अनुभव देते. ही रेल्वेगाडी प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – कवच समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन 392 टन आहे , जे आधी 430 टन होते.यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे . या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्तीत असलेल्या 24 इंच रुंदीच्या स्क्रीनच्या तुलनेत प्रत्येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्क्रीन आहेत ज्याद्वारे प्रवाशांना माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते.
या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस पर्यावरणस्नेही देखील ठरत आहे ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह, या रेल्वेगाडीतील प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल.एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये 180-अंशात फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये (आरएमपीयु ) फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.
Maharashtra Again 2 Vande Bharat Express Cities Benefit