मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे, असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत’ या शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महात्मा फुले आणि चंद्रकांत पाटील यांची तुलना केली. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाचे बिजारोपण झाले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. उर्फी जावेदला टोकाचा विरोध केल्याने चर्चेत आलेल्या चित्रा वाघ आता नव्या वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वीही त्या चर्चेत राहिल्या आहेत. आता पुण्यातील हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पुणे स्त्री शक्तीचे केंद्र
चित्रा वाघ म्हणाल्या की, आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे.
मटकरींचा जपून बोलण्याचा सल्ला
चित्रा वाघ यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांना फार प्रगल्भ समजत होतो, मात्र मानसिक संतुलन ढासळल्यासारखे त्या वागत आहेत. आज त्यांनी कमाल केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत केली आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी असे वक्तव्य करत आहात. अशी वक्तव्ये जरूर करावीत, मात्र यामध्ये महापुरुषांना घेऊ नये, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. तुमचा पक्ष अगोदरच गोत्यात आलेला आहे. त्यात तुम्ही आग ओतण्याचे काम करू नका, जपून बोला, असा सल्ला त्यांनी दिला.
पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांचं अजब विधान, वाघ यांच्याकडून चंद्र.पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुलेंशी !
"तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत,चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे" हेच विधान इतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले असते तर?— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 29, 2023
BJP Leader Chitra Wagh Comparison Mahatma Phule