महाड – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरातून दुपारी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर अडीच तासानंतर त्यांना महाड पोलिस स्थानकात नेण्यात आले. रात्री १० वाजता त्यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. तासाभराच्या युक्तीवादनानंतर रात्री १०.४५ वाजता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आज दिवसभर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. काही ठिकाणी दगडफेक, मारहाणीचे प्रकारही घडले. या अटकेवरुन भाजपने सरकारवर जोरदार टीका केली. तर राणे यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी जल्लोष केला. दिवसभर घडलेल्या या घटनेनंतर रात्री महाड येथील न्यायालयात सुनावणी झाली. येथे पोलिसांनी ७ दिवसाची कोठडीची मागणी करण्यात आली. पण, न्यायालयाने राणे यांना जामीन दिला. त्यानंतर नाशिक व पुणे पोलिस त्यांचा ताबा घेणार असल्याचे बोलले जात होते. पण, हा ताबा हे पोलिस घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे.