इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारेही शिधा मागवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत 1000 मेट्रिक टनांहून अधिक शिधा वितरित करण्यात आला असून, संपूर्ण महाकुंभ नगरी आणि प्रयागराजमध्ये 20 फिरत्या वाहनांच्या माध्यमातून हा पुरवठा सुरू आहे.
फिरत्या वाहनांद्वारे आश्रम आणि भाविकांपर्यंत पोहोचत आहे स्वस्त दरातील शिधा
महाकुंभमध्ये संत, कल्पवासी आणि भाविकांना अन्नटंचाई भासू नये म्हणून फिरत्या वाहनांद्वारे थेट शिधा पोहोचवला जात आहे. नाफेड
चे राज्य प्रमुख रोहित जैन यांनी सांगितले की, सहकार मंत्रालयाच्या या विशेष योजनेअंतर्गत कोणत्याही भाविकाला अन्नसंबंधी अडचण येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक भाविकाला वेळेवर शिधा मिळावा यासाठी नाफेड
चे व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल स्वतः संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारे मागवा शिधा
महाकुंभमध्ये उपस्थित भाविक 72757 81810 या क्रमांकावर दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅपद्वारे शिधा मागवू शकतात. अनुदानित शिधामध्ये गहू पीठ आणि तांदूळ 10 किलोच्या पिशवीमध्ये तसेच मूग, मसूर आणि चणाडाळ 1 किलोच्या पिशवीमध्ये वितरित केली जात आहे. फिरत्या वाहनाद्वारे मिळालेल्या मागणीनुसार तातडीने संबंधित आश्रम आणि साधूंना शिधा पोहोचवला जात आहे.
आतापर्यंत 700 मेट्रिक टन गहू पीठ, 350 मेट्रिक टन डाळी (मूग, मसूर, चणाडाळ) आणि 10 मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. नाफेडची
उत्पादने आणि ‘भारत ब्रँड’ धान्ये भाविकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवत आहेत.
या योजनेद्वारे, सरकार महाकुंभमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना केवळ उच्च दर्जाचा शिधा उपलब्ध करून देत नाही, तर ही प्रक्रिया सुलभ आणि सहजसाध्य देखील करत आहे. फिरती वाहने आणि मागणीनुसार सेवा या सुविधेला अधिक प्रभावी बनवत आहेत. यामुळे महाकुंभ 2025 हा प्रत्येक भाविकासाठी स्मरणीय आणि आनंददायक अनुभव ठरत आहे.