इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्तीसगडमधील बीजापूर इथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलांची ही कामगिरी म्हणजे भारताला नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने मोठे यश असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया सामायिक केली आहे. सुरक्षा दलांनी भारताला नक्षलवादमुक्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधले मोठे यश मिळवले आहे. त्यांनी या कारवाईत ३१ नक्षलवादी ठार केले, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जप्त केल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
आज मानवतेविरोधातील नक्षलवादाचा नायनाट करत असताना आपण दोन शूर जवान गमावले असल्याची माहितीही केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली. देश या वीरांचा सदैव ऋणी राहील अशा शब्दांत त्यांनी या वीरांना आदरांजली वाहिली आहे. अमित शहा यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या शोक भावना व्यक्त केल्या असून त्यांचे सांत्वनही केले आहे.
३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल, आणि नक्षलवादामुळे कोणत्याही नागरिकाला आपला जीव गमवावा लागणार नाही याची सुनिश्चिती केली जाईल असा ठाम निर्धारही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.