मुंबई – पावसाळा संपून एक आठवडा उलटला तरी अद्यापही पाऊस काही महाराष्ट्राची पाठ सोडायला तयार नाही, दिवाळी सणाच्या काळातच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तसेच शनिवारी देखील पावसाने हजेरी लावली. आज अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात बदल होत असतानाच कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० किमी प्रति तास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. आज, रविवारी सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, गेल्या २४ तासात मुंबईत १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दि. ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाट होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये उद्या सोमवारी पाऊस पडू शकतो, तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानाममध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडू शकतो.
दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. वीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, रत्नागिरी तालुक्यात जोदार पाऊस झाला. रायगडमध्ये खोपोली, खालापूर, सुधागड, पेण, नागोठणे, श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव, माणगाव, उरण तालुक्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील शिरूर जुन्नर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने झोडपले असून ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पावसामुळे काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे तर काही भागातील शेतकरी मात्र सुखावला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, भूईमूग यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून नुकतेच पेरणी झालेल्या ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना हा पाऊस मात्र वरदान ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले निफाड दिंडोरी चांदवड या तालुक्यांमध्ये तालुक्यातील अनेक गावामधील कांदा व इतर बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कादा उत्पादक शेतकरी या अवकाळी पावसाने ज्यादा चितेंत आहे. आधीच मागील पावसाने झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही. आता या पावसाने नुकसान झालेल्या पिकासाठी नुकसान भरपाई कधी मिळणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.