इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. डबरा तालुक्यातील जंगीपुरामध्ये लव्ह जिहादची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय हिंदू युवतीचे धर्मपरिवर्तन करून एका मुस्लिम कुटुंबाने सात महिने डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केला. तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर संबंधित युवतिने बहिणीसह पोलिस ठाण्यात धाव घेतली. सर्व आरोपींविरुद्ध मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम, बलात्कार, कैद करून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी, त्याची आईला ताब्यात घेण्यात आले असून, दोन दिरांचा शोध सुरू आहे.
पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, इम्रान नावाच्या युवकाने राजू जाटव नाव धारण करून शितला माता मंदिरात तिच्याशी हिंदू रीतीप्रमाणे लग्न केले होते. परंतु त्यानंतर तो मुस्लिम असल्याचे कळले. तेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तिला जबरदस्ती करण्यात आली. मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर तिचा आणि इम्रानचा निकाह मौलान ओसामाने लावून दिला. मौलानाने त्याच रात्री तिच्यावर अत्याचार केला.
निकाह लावून दिल्यानंतर तिला इम्रानच्या कुटुंबातील सदस्य मारहाण करू लागले. तिला एका खोलीत कैद केले. पुन्नी आणि अमन या दोन दिरांनी सासू सुग्गा बेगमच्या उपस्थितीत तिच्यावर बलात्कार केला. सासू सुग्गा बेगम हिच्यासोबत आलेल्या दोन जणांनीही तिच्यावर अत्याचार केला.
ग्वाल्हेरच्या गोल पहाडिया परिसरातील नवग्रह कॉलनीतील रहिवासी पीडित युवतीने घडलेला प्रसंग पोलिस ठाण्यात सांगितला. तिने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ रोजी राजू राटव नावाच्या युवकाशी तिची भेट झाली होती. जंगीपुरा मदरशाजवळ राहात असल्याचे त्याने सांगितले होते. १५ जून रोजी तो तिला एका वाहनात डबरा येथे घेऊन गेला. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान ती गर्भवती राहिली. दोघांचे लग्न लावून देण्याचे राजूच्या आईने आश्वासन दिले. लग्नापूर्वी बाळ जन्माला आले तर दोन्ही घरांचे नाव बदनाम होईल असे सांगून आरोपी राजूने तिचा गर्भपात केला.
राजूने १८ सप्टेंबर रोजी तिच्याशी शितला माता मंदिरात विवाह केला. त्याच दिवशी सिटी सेंटर येथील एका हॉटेलात त्यांनी पार्टी दिली. लग्नानंतर राजू तिला कुटुंबीयांना भेटण्यासाठी घेऊन गेला तेव्हा ते मुस्लिम असल्याचे कळले. त्याचे खरे नाव इम्रान आहे असेही कळले. नंतर आरोपीने मौलाना ओसामाला घरी बोलावले. मौलाना म्हणाला, की तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय हा निकाह मान्य होणार नाही. युवतीच्या आई-वडिलांनी तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. निकाह झाल्यानंतर मौलाना ओसामाने आणि त्यानंतर तिच्या दिरांनी युवतीवर अत्याचार केला.